आपल्याला ग्रामर तर येतं मग इंग्रजी का बोलता येत नाही?

आपल्यापैकी बरेच जण अशा शाळेत शिकलोय जिथे शिकविण्याचे माध्यम मराठी हेच होते. शाळेतले शिक्षकही कायम मराठीतूनच संवाद साधत असत. बऱ्याच सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडीयम शाळेतही अशीच परिस्थिती होती, किंबहुना आजही आहे. इंग्रजीशी आपला संबंध तेव्हाच यायचा जेव्हा आपले शिक्षक इंग्रजीचा एखादा पाठ आपल्याला वर्गात उभं करून वाचायला लावायचे किंवा आपण जेव्हा होमवर्क करायचो. अभ्यासक्रमही असा होता की आपण इंग्रजी व्याकरणाचे नियम आणि इंग्रजी शब्द पाठ करायचो. परीक्षेतही तेवढच तपासलं जायचं.

Albert Einstein Quote

आपले शिक्षक आपल्याला अगदी त्याच पद्धतीने इंग्रजी शिकवायचे ज्या पद्धतीने ते स्वतः शिकले असतील. अर्थातच त्यांना भाषा शिकविण्याची ती एकच पद्धत ठाऊक होती. ह्याचा परिणाम असा झाला की आपल्यासारख्या छोट्या शहरांतून अथवा ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण (ग्रामर) तर उत्तम येत असतं पण इंग्रजी बोलायचं म्हटलं कि आपली बोबडी वळते.


ग्रामर येत असूनही आपण इंग्रजी का बोलू शकत नाही:

आपल्यासारख्या ग्रामीण भागातून किंवा छोट्या शहरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीशी फारच कमी संबंध यायचा. इंग्रजीतून बोलण्याची वेळ तर कधीच येत नसे कारण मराठी आणि फार फार तर हिंदी ने आपलं भागायचं. ना आपण इंग्रजीतून काही वाचायचो ना टीव्ही वरील इंग्रजी बातम्या अथवा अन्य इंग्रजी कार्यक्रम बघायचो वा ऐकायचो. आपल्या घरी तर सोडाच, शाळा वा कॉलेजातही कुणी इंग्रजी बोलत नसायचं. इंग्रजी आणि आपला संबंधच कधी येत नसे. अशाप्रकारे ऐकणे, वाचणे, लिहिणे आणि बोलणे ह्यातुन भाषेचा जो विकास होतो तो आपल्या बाबतीत कधी झालाच नाही. परीक्षेसाठी म्हणून वाचणे आणि लिहिणे ह्यातून इंग्रजी बोलता येईल इतपत तिचा विकास कधीच होऊ शकत नाही.

आता शहरातील विद्यार्थ्यांचेच बघा ना, ते कायम इंग्रजीच्या संपर्कात असतात. त्यांच्या घरी, शेजारी, शाळा अथवा कॉलेजात कुठे ना कुठे इंग्रजी बोलली जाते व ती त्यांच्या कानावर पडत राहते. इंग्रजी साहित्य, वर्तमानपत्र, टीव्ही वरील इंग्रजी बातम्या आणि अन्य कार्यक्रम ते अधेमधे बघत वा ऐकत असतात. अशाप्रकारे त्यांचा इंग्रजी भाषेचा विकास अगदी लहानपणापासूनच होत असतो.


मी इंग्रजी बोलणं शिकण्यासाठी काय केलं:

इंग्रजीच्या सतत संपर्कात राहता यावे म्हणून मी एका इंग्लिश ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश घेतला. कॉलेज मध्ये असताना इतर लोक जे इंग्रजीतून बोलायचे ते मी लक्षपूर्वक ऐकायचो कारण त्यातूनही बरंच शिकायला मिळायचं. ट्रेनिंग सेंटर मुळे आता मला इंग्रजी ऐकण्या, वाचण्या, लिहिण्या आणि बोलण्याचा सराव करता येऊ लागला. तिथले ट्रेनर मला माझ्या चुका सुधारण्यास आणि अधिक चांगली वाक्ये बोलण्यास मदत करत जे मी स्वतः एकट्याने करणे जमले नसते.


तिथे नुसतं ग्रामर शिकण्यापेक्षा रोजच्या वापरात उपयोगी पडेल असं इंग्रजी शिकण्यावर जास्त भर होता. ह्यातच मला हेही कळून चुकलं कि बरंचसं ग्रामर नसेल येत तरीही इंग्रजी बोलणे शिकता येते. जसजसा मी बोलायला लागलो तसतसा माझा कॉन्फिडन्स वाढायला लागला. सर्वात महत्वाचे म्हणजे मी आता चुका करायला घाबरत नव्हतो. हळूहळू मी न अडखळता इंग्रजी बोलायला लागलो.

तुमच्या लक्षात आले मी नेमका काय बदल केला इंग्रजी शिकण्याच्या पद्धतीत? मी स्वतःभोवती असे वातावरण निर्माण केले ज्यामुळे मी सतत इंग्रजीच्या संपर्कात राहील. ऐकून, वाचून आणि लिहून जे मी शिकत होतो ते बोलून दाखविण्याची संधी मला ट्रेनिंग सेन्टर मुळे मिळाली. सोबतीला योग्य मार्गदर्शन करणारे ट्रेनर होतेच, त्यामुळे बोलण्याचा भरपूर सराव करता आला. हा सरावच तर महत्वाचा असतो जो आपण शाळा आणि कॉलेजात कधीच करत नसतो.


Thomas Jefferson Quote

तुम्हीही इंग्रजीतुन बोलणे शिकायला खालीलप्रमाणे प्रयत्न करू शकता:

  • ग्रामर ची जुनी पुस्तके आणि नोट्स पुन्हा पुन्हा वाचून काहीही उपयोग नाही. इतकी वर्षे तेच तर केलंय. इंग्रजी बोलायला सुरुवात करता येईल एवढे ग्रामर तुम्ही शाळेत शिकला आहात. जरा ग्रामरच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायला हवा.

  • इंग्रजीच्या सतत संपर्कात राहा आणि त्यासाठी इंग्रजी ऐका, वाचा, लिहा आणि महत्वाचे म्हणजे बोला.

  • एखाद्या उत्तम ट्रेनिंग सेन्टर मध्ये प्रवेश घ्या, अथवा ऑनलाईन ट्रेनिंग चा पर्याय निवडा ज्यामुळे तज्ज्ञ व अनुभवी ट्रेनर्स च्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला उत्तमरीत्या इंग्रजी शिकता येईल.

  • मोबाईलवर फ्री ऍप्स च्या माध्यमातूनही इंग्रजी शिकता येईल; परंतु हे ऍप्स ग्रामर शिकण्यासाठी, इंग्रजी वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उपयोगी ठरतील, बोलण्यासाठी नाही. तेव्हा ऍप्स चा उपयोग तुमच्या ट्रेनिंगबरोबर अतिरिक्त सरावासाठी करा.

एखादे ट्रेनिंग इन्स्टिट्युट किंवा ट्रेनर उत्तम आहे कि नाही हे कसे ओळखावे:

तुमच्या आसपास "नम्बर वन" असणारे बरेच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि ट्रेनर्स असतील. पण ह्यातले बरेच लोकांच्या ट्रेनिंग विषयीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन केवळ पैसे उकळण्याचे काम करतात. खरे परिणामकारक ट्रेनिंग कसे असते हे त्यांनाही ठाऊक नसते. अशा ट्रेनिंग सेंटर्स आणि ट्रेनर्स मुळे इंग्रजी बोलता येणे तर लांबच राहिले, उलट तुमचा वेळ आणि पैसा वाया जातो. तेव्हा योग्य ट्रेनिंग सेन्टर अथवा ट्रेनर ची पारख करता येणे अत्यंत महत्वाचे आहे.

  • ट्रेनर ची योग्यता तपासून पाहण्यासाठी त्यांचे शिक्षण, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचा अनुभव आणि त्यांच्या कौशल्याबाबत योग्य माहिती जाणून घ्या. ह्यासाठी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट, लिंक्डइन अकाउंट, त्यांची वेबसाईट आणि त्यांना मिळालेले रिव्युज तपासून पहा.

  • जे लोक अशा इन्स्टिट्यूट व ट्रेनर कडून शिकले आहेत त्यांचा अनुभव जाणून घ्या. महत्वाचे म्हणजे हा अनुभव हे लोक इंग्रजीतून सांगतात कि नाही ह्याकडे लक्ष द्या. ते इंग्रजीतून बोलत असतील तर नक्कीच त्यांचे ट्रेनिंग चांगले होते असे समजण्यास हरकत नाही.

  • वर्गात बसून शिकविणे आणि ऑनलाईन ट्रेनिंग करणे ह्यात बरेच अंतर आहे. प्रत्येक ट्रेनर ला ते जमेलच असे नाही.

  • जेवढे तुमचे ट्रेनर्स अनुभवी आणि कौशल्यपूर्ण असतील तेवढा चांगला परिणाम तुमच्या शिकण्यावर होईल.

  • सर्वांना लक्षात घेऊन तयार केलेल्या एखाद्या साधारण स्पोकन इंग्लिश प्रोग्राम पेक्षा, तुम्हाला उपयोगी पडेल असा आणि खास तुमच्यासाठी तयार केलेला प्रोग्राम निवडला तर तुमची शिकण्याची शक्यता खूप जास्त वाढेल. डॉक्टर इतरांना देतात तीच गोळी तुम्हालाही सूट होईल असे नाही, कधी कधी तुम्हाला सूट होईल अशी वेगळी गोळीही डॉक्टर देतात आणि तेव्हाच तिचा फायदा तुम्हाला होतो. ट्रेनिंगचेही तसेच आहे.

  • ट्रेनिंग च्या दरम्यान तुम्ही जे शिकाल त्याचे मूल्यमापन कसे केले जाते हे फार महत्वाचे असते, कारण त्याशिवाय तुम्हाला कळणार कसे कि तुम्ही इंग्रजी बोलायला शिकलात कि नाही. केवळ लिखित स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये मिळविलेल्या गुणांचा आणि तुमच्या इंग्रजी बोलण्याचा किती संबंध असतो हे इतकी वर्षे शाळा आणि कॉलेजात इंग्रजीच्या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवूनही जेव्हा इंग्रजी बोलता येत नाही ह्यावरून तुमच्या लक्षात यायला हवे.

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तसेच करिअर मध्ये तुम्हाला इंग्रजीचा कसा फायदा होऊ शकतो:

माझे ग्रॅज्युएशन पूर्ण होताच मी पुण्यातील एका BPO मध्ये काम करायला सुरुवात केली. माझ्या उत्तम संभाषण कौशल्यांमुळे वर्षभरातच मी ट्रेनर झालो. गेल्या १२ वर्षांपासून मी ट्रेनिंग च्या क्षेत्रात काम करतोय. ह्या दरम्यान ऍमेझॉन सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत ट्रेनर आणि मॅनेजर्सना ट्रेनिंग देण्याचे कामही मी केले.


ऍमेझॉन च्या पुणे, दिल्ली , कोइंबतोर आणि वर्चुअल कस्टमर सर्विस साठी काम करणाऱ्यां लोकांचे ट्रेनिंग करणाऱ्या ट्रेनर्स ना मी ट्रेनिंग दिले. पुढे जाऊन २०१८ साली स्वतःची ट्रेनिंग कंपनी स्थापन केली ज्याद्वारे मी शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या; आणि लोकांना ट्रेनिंग पुरविण्याचे काम करतो. जर मी इंग्रजीला घाबरून जाऊन ती शिकण्याचा प्रयत्न केला नसता तर आज मी जे मिळविले आहे ते मी कधीच मिळवू शकलो नसतो.

Learning Quote, Attitude Quote

ट्रेनिंगच्या निमित्ताने असे बरेच लोक भेटतात जे केवळ उत्तम इंग्रजी बोलता येत नाही म्हणून नोकरी मिळवू शकत नाहीत किंवा इतर पात्रता असतानाही ह्याच कारणामुळे वरच्या पदावर जाऊ शकत नाहीत. ह्यात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक तसेच राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अगदी सुरुवातीच्या, मध्यम किंवा वरच्या पदांवर काम करणाऱ्या लोकांचा आणि व्यावसायिकांचाही समावेश होतो. विद्यार्थी असो, नोकरदार वा व्यावसायिक; सगळेच वेळेत इंग्रजी न शिकल्याने पश्चाताप करत बसलेले असतात. अशीच काहीशी स्थिती नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा इंग्रजी येत नाही म्हणून नोकरी मिळत नाही त्यांची असते; कारण त्यांच्यासारख्याच इतरांना, ज्यांना इंग्रजी येते, त्यांना नोकऱ्या मिळत असतात.

बरेचसे शिक्षक आणि प्राध्यापक जे मुलांना शिकवितात तेही इंग्रजीतून बोलू शकत नाहीत. अशा लोकांनीही जर इंग्रजी बोलणे शिकून घेतले तर त्यांचे विद्यार्थीही त्यांच्याकडून नक्कीच शिकू शकतील. खरे तर शिकण्याला वय, तुमचे काम किंवा तुमचे स्टेटस ह्याचे बंधन नसावे.

आता मला खात्री आहे कि तुम्हाला कळलंय इंग्रजी बोलायला नेमकं काय करावं लागेल. तुमचे काही प्रश्न असतील वा काही चर्चा करायची असल्यास तुम्ही मला संपर्क साधू शकता. मला तुमची मदत करायला नक्कीच आवडेल.

हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुमच्यासारखीच इतरांनाही ह्या लेखात दिलेली माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आमचे लेख असेच वाचत राहण्यासाठी वेबसाईटला नक्की सबस्क्राईब करा.

724 views0 comments