top of page

नोकरी मिळविण्यासाठी लागणारी कौशल्ये शाळा आणि कॉलेजात खरंच शिकविली जातात का?

आपली मुले शाळा किंवा कॉलेजात जातात तर खरी पण तिथे त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते ह्याचा विचार आजही बरेच पालक करताना दिसत नाहीत. किंबहुना त्यांना त्याबद्दल फारशी माहितीच नसते. गेल्या १२ हुन अधिक वर्षांपासून राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत ट्रेनिंग च्या क्षेत्रात काम करताना मला एक गोष्ट सतत आणि प्रकर्षाने जाणवत राहिली आहे; ती म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे परीक्षेत मिळविलेल्या गुणांव्यतिरिक्त इतर कुठलीही कौशल्ये नसतात. फारच कमी विद्यार्थी नवनवीन कौशल्ये शिकून यशस्वी होतात.मी बरेच असे विध्यार्थी पाहिलेत जे अभ्यासात तर खूप हुशार असतात पण इच्छा असूनही ते चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवू शकत नाहीत. विशेषतः व्यावसायिक शिक्षण घेताना असे विद्यार्थी केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवतात आणि इतर बाबतीत मात्र मागे राहून जातात; जसे कि प्रेझेंटेशन, ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्यू.


काही विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतातही पण त्या कमी पगाराच्या असतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात वरच्या पदावर जाण्याचा मार्ग खडतर होऊन बसतो कारण त्यासाठी आवश्यक कौशल्येच त्यांच्याकडे नसतात. फक्त अभ्यासात हुशार म्हणजे नोकरी हे समीकरण केव्हाच बदलले आहे; पण आपली शिक्षण पद्धती अजून म्हणावी तशी बदललेली नाही.


तेव्हा अभ्यासाबरोबरच खाली उल्लेखलेल्या कौशल्यांचा विकास हाच नोकरी मिळविण्याची चावी ठरु शकतो. परंतु हि कौशल्ये आत्मसात करून त्यांचा पुरेसा व योग्य पद्धतीने सराव केला तरच ती परिणामकारक ठरतात. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शाळेत असतानाच, अगदी आठव्या वर्गापासून, हि कौशल्ये विद्यार्थ्यांना क्रमाक्रमाने शिकविण्यास सुरुवात करावी म्हणजे ग्रॅजुएशन होईपर्यंत ह्या कौशल्यांना सवयीचे स्वरूप प्राप्त होईल. परंतु त्यासाठी शिक्षक आणि पालकांनी सर्वप्रथम खालील दोन बाबी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ह्या बाबींची पूर्तता झाली कि कौशल्यांचा विकास सहज घडवून आणता येईल.