सोशल मीडिया वरील भांडणांनी दुरावलेल्या मित्रांना क्रिटिकल थिंकिंग जवळ आणू शकेल काय?

कुणीतरी म्हणतो, कुठेतरी लिहिलंय, मी स्वतः पाहिलंय किंवा ऐकलंय म्हणून एखादी गोष्ट खरी कि खोटी हे ठरवून तुम्ही मोकळे होता काय?


ह्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर जरा थांबा!


आश्चर्यचकित झालात ना? साहजिक आहे. परंतु असे म्हणण्याचे कारणही तेवढेच महत्वाचे आहे.


जे काही आपण ऐकतो किंवा वाचतो ते त्या सांगणाऱ्याचे किंवा लिहिणाऱ्याचे स्वतःचे मत असते. ती वस्तुस्थिती असेलच असे नाही.


त्याचप्रमाणे आपण जे बघतो तो आपला स्वतःचा दृष्टिकोन असतो. तेव्हा तुम्ही जे बघताय तेही खरे असेलच असे नाही.


खालील चित्र काळजीपूर्वक बघा.चित्रातील उजवीकडच्या माणसाला तीन बार दिसतायत तर डावीकडच्या माणसाला चार बार दिसतायत. दोघांचाही दृष्टिकोन आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. त्यांच्या दृष्टिकोनावर आधारित त्यांची दोघांची मतेही अगदी ठाम असतील. उजवीकडचा तीन बार पाहिल्याचे सांगेल तर डावीकडचा चार.

आता आपण त्या दोघांच्याही सांगण्यावर लगेच विश्वास न ठेवता खरं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.


तुम्हाला काय वाटतं चित्रात किती बार आहेत? तीन कि चार?

अर्रे व्वा! बघितलं तुम्ही विचार करायला लागलाय. तुम्ही उजवीकडुन नीट पाहीलं. डावीकडूनही बघताय.


तीनच तर आहेत. नाही-नाही चार आहेत. कसं मिळेल बरं उत्तर? चला शोधूया.

1. जी व्यक्ती असे चित्र काढू शकते अशा एखाद्या व्यक्तीला विचारूया का?


2. असे चित्र कसे काढतात ते इंटरनेट वर शोधूया का?


3. त्याचा एखादा विडिओ युट्युब वर मिळाला तर बघूया का?

4. युट्युब वर वेवेगळ्या प्रकारे सर्च केलं आणि शेवटी "ऑप्टिकल इल्युजन ड्रॉईंग" असं सर्च केल्यावर ह्या चित्राविषयी अधिक माहिती मिळाली


- हा बघा विडिओ. (चित्रकाराचे कौशल्य नक्कीच वाखाणण्यासारखे आहे) आपल्या प्रश्नाचे उत्तर मी ह्या लेखात खाली दिले आहे.


- खरं तर चित्रकाराने तीनच बार काढले (कारण त्याने नऊ रेषा ओढल्या)


- पण नंतर थोडीशी चलाखी करून दृष्टीभ्रम होईल असे बदल चित्रात केले


- तुम्ही चित्राकडे नीट बघून फक्त पूर्ण असलेल्या बार्स वर लक्ष केंद्रित करा. - येथे केवळ टोकाचे दोन बार्स पूर्ण आहेत. मधे दिसणारे (मग तो एक असो वा दोन) अर्धवटच आहेत असे लक्षात येते.


पाहिलंत, जेव्हा आपण बारकाईने विचार केला आणि खरं काय ते शोधून काढलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की सत्य तर वेगळंच आहे.


चित्रकाराने चित्र तर काढलं पण त्यामागचं सत्य मात्र सांगितलं नाही.


आजकाल अगदी असंच कुठून तरी एखादा मेसेज, व्हिडीओ येतो किंवा अफवा पसरवली जाते.


ह्या चित्रकारासारखीच चलाखी दाखवून त्या मेसेज किंवा व्हिडीओ मध्ये विशिष्ठ प्रकारचे बदल घडवून आणले जातात ज्यामुळे संभ्रम निर्माण होईल आणि लोक त्यामागचे सत्य ठाऊक नसतानाही नाहक एकमेकांच्या जीवावर उठतात. हो ना?


आता आपण चित्रामागचे सत्य शोधण्यासाठी काय-काय केलं ते पुन्हा एकदा बघूया:


- चित्र नीट पाहिलं


- चित्रामधील उजवीकडचा माणूस काय म्हणतो आणि डावीकडचा काय म्हणतो तेही पाहिलं


- मग स्वतः नीट लक्षपूर्वक विचार केला


- नेमके तीन कि चार बार ते शोधून काढण्याचा वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केला


- सत्य शोधून काढले

ह्यालाच तर क्रिटिकल थिंकिंग म्हणतात. अगदी थोडक्यात आणि सोप्प्या शब्दात सांगायचे तर-


क्रिटिकल थिंकिंग म्हणजे, "खरे-खोटे, योग्य-अयोग्य ह्याची पारख करून समंजसपणे स्वतःचे निर्णय घेता येण्यासाठी लागणारी विचार करण्याची क्षमता"

तुमच्यापैकी बहुतेकांनी हि संकल्पना ऐकली असेल पण तिचे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे स्थान आहे ह्याकडे फारसे लक्ष दिले नसेल. खरं तर हि फार व्यापक संकल्पना आहे.


ह्या लेखात आपण वर्तमान स्थितीत क्रिटिकल थिंकिंगची भूमिका किती महत्वाची आहे ह्याबद्दल चर्चा करूया.

आज इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे माहितीचा प्रसार फार वेगाने होतोय. प्रत्येकाचा मोबाइल फोन हा प्रचंड माहितीचा मुख्य स्रोत बनला आहे. जो तो आपापल्या परीने माहिती मिळवतो खरी, परंतु त्या माहितीची सत्यता फारच कमी लोक पडताळून पाहतात आणि इथेच एक भयानक प्रकार सुरु होतो.


क्रिटिकल थिंकिंग च्या अभावाने अशी बरीच माहिती एकमेकांना शेअर केली जाते. ती पूर्ण समाजात पसरते आणि मग सुरु होतात सोशल मीडियावरील चॅट वॉर (वादविवाद) आणि ट्रोलिंग.लोक तासनतास हेच करत बसतात. पक्के मित्र आणि सख्खे शेजारीही एकमेकांचे शत्रू होऊन जातात.

अगदी कधी काही संबंधही आला नाही अशा अनोळखी लोकांशीही वादविवाद करत बसतात. ह्याचे रूपांतर बऱ्याचदा भांडणांत आणि काही वेळेस दंगलीतही होते. केवळ क्रिटिकल थिंकिंगच्या अभावामुळेच परिस्थिती हाताबाहेर जाते.


आपल्याकडे सुमारे 99% चॅट वॉर आणि ट्रोलिंग फक्त आपापला (बहुतांशी चुकीचा) दृष्टिकोन आणि मत एकमेकांना पटवून सांगण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांतून होते. अगदी वरील चित्रामधल्या त्या दोन माणसांसारखी.

यामुळेच आज क्रिटिकल थिंकिंगचे महत्व फार जास्त आहे. केवळ क्रिटिकल थिंकरच अर्थपूर्ण चर्चा करू शकतात. सोशल मीडिया वरील भांडणांनी दुरावलेल्या मित्रांना केवळ क्रिटिकल थिंकिंगच जवळ आणू शकेल.


परंतु, खरा आणि योग्य दृष्टिकोन असणारे क्रिटिकल थिंकर्स आजच्या परिस्थितीत जेमतेम 5% आहेत असे म्हणावे लागेल .


आता तुम्हीच सांगा तुम्हाला त्या 95% लोकांच्या संख्येत भर घालायचीय ज्यांच्याकडे स्वतःचा म्हणता येईल असा दृष्टिकोनच नाही की 5% क्रिटिकल थिंकर्सच्या संख्येत?


ता. क. - क्रिटिकल थिंकिंगचे महत्व एवढ्यापुरतेच मर्यादित नसून ह्याचा उपयोग तुमच्या वैयक्तिक, वैवाहिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक तसेच तुमच्या नोकरीच्या ठिकाणी आणि इतरही अनेक बाबतीत होतो.

तेव्हा क्रिटिकल थिंकिंगचे महत्व आणि एक उत्तम क्रिटिकल थिंकर कसे व्हावे हे जाणून घेण्यासाठी लवकरच येणारे आमचे पुढचे दोन लेख जरूर वाचा.


सोशल मीडिया वरील बऱ्याचशा वादग्रस्त पोस्ट्सच्या मागचे सत्य जाणून घ्यायचेय? मग फेसबुकवरील हि पोस्ट नक्की वाचा! ही पोस्ट तुम्हाला सत्य शोधण्याचा योग्य मार्ग दाखवेल "खरे की खोटे?"
 

लेखकाविषयी:


81 views0 comments