पालकांचं थोडं चुकतं असं नाही वाटत का?1. मुलांच्या चिकित्सा वृत्तीला आळा:

सगळीच लहान मुले प्रश्न विचारतात. हे अगदी नैसर्गिक आहे. पण बहुतेक पालकांना हे इरिटेटिंग वाटायला लागते आणि मग सतत प्रश्न विचारू नयेत, तुला एवढंही येत नाही का, असे प्रश्न विचारल्याने दुसरे काय म्हणतील, प्रश्न विचारणारा कसा मंद असतो वगैरे वगैरे मुलांना ऐकवले जाते.

परिणामी, मुलांना प्रश्न विचारणे चुकीचे वाटू लागते. प्रश्न विचारण्याची आवड निर्माण होण्याऐवजी मुलांना त्याची भीती वाटायला लागते. मग ते सगळं समजून न घेता नुसतं पाठ करायला लागतात. अशाप्रकारे त्यांच्या चिकित्सा वृत्तीला आळा बसून बौद्धिक विकासहि जसा व्हायला हवा तसा होत नाही.


2. इतर मुलामुलींशी तुलना:

त्याचा बघ कसा पहिला नम्बर आला. तिला बघ किती बक्षिसे मिळतात. पालक नेहमी आपल्या मुलांची इतरांच्या मुलांशी तुलना करतात. त्यांना वाटते कि असे केल्याने आपल्या मुलांना त्यांच्यासारखे करून दाखविण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल.

पण अशी वारंवार तुलना केल्याने मुलांना हळूहळू वाटायला लागते कि त्यांनी काहीही केले तरी ते इतरांच्या तुलनेत नेहमी कमीच लेखले जातील, कारण नेहमीच कुणीतरी त्यांच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हेच सांगितले जाईल.


3. चार लोक काय म्हणतील ह्याची भीती:

मुलांपेक्षा लोक काय म्हणतील ह्या बाबीला आपल्या समाजात सर्वोच्च स्थान आहे. मुलांनी आयुष्यात काय करावे, कुठले कपडे घालावेत, कोणत्या प्रकारचे काम करावे, कुणाशी लग्न करावे हे सगळे निर्णय घेताना लोक काय म्हणतील ह्या प्रश्नाचे उत्तर आधी शोधण्याचा आटापिटा जास्त केला जातो. जे निर्णय मुलांचे स्वतःचे असावेत, त्यावर इतरांच्या विचाराचा दबाव जास्त असतो. अदृश्य लोकांची मते मुलांच्या मतांहून आणि भावनांहून अधिक महत्वाची असतात.


4. बदललेल्या जगाकडे बघण्याचा न बदललेला दृष्टिकोन:

आपल्या पालकांचे जीवन बहुधा खडतरच होते. त्या काळची परिस्थिती आणि पद्धती फार वेगळ्या होत्या. त्यामुळे आयुष्याबद्दलचे आणि त्यात घडणाऱ्या घटनांबद्दलचे त्यांचे एकंदर काही समज आहेत. आसपासची परिस्थिती आणि एकंदर जग बदलले तरीहि ते समज आणि त्या पद्धती तशाच कायम आहेत. नकळत आपल्या मुलांवरहि ते बिंबवण्याचा प्रयत्न ते करत असतात.


5. चूक स्वीकार करणे किंवा जबाबदारी घ्यायला न शिकविणे:

लहानपणी आपण पडलो किंवा धडकलो आणि आपल्याला लागलं; तर जिथे आपण पडलो त्या जागेला किंवा ज्या वस्तूला आपण धडकलो तिला दोष दिला जातो. जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा एक तर परिस्थितीला दोष दिला जातो किंवा दुसऱ्या कुणामुळे तरी ते झाले असे म्हणून आपल्याला समजावले जाते. ह्यामुळे बऱ्याच जणांना स्वतःच्या चुकीचा किंवा केलेल्या कृत्याचा स्वीकार करणे अथवा त्याची स्वतः जबाबदारी घेणे जमतच नाही. ट्रॅफिकमधे एकमेकांशी भांडणारे व चूक स्वतःची नसून ती दुसऱ्याचीच कशी आहे, रस्ताच कसा चुकीच्या पद्धतीने बांधलाय, सिग्नल कसा चुकलाय इ. बोलणारे लोक पाहिले कि ह्याची रोज प्रचिती येते.


6. पैसा हि संकल्पना मुलांना न शिकविणे:

आपल्यापैकी बहुतेक जणांना पैसे, काटकसर, कर्ज, गुंतवणूक इत्यादी बाबींची तसूभरही माहिती नसते. तशी माहिती किंवा त्याबद्दलचे ज्ञान आपल्याला दिलेच जात नाही. आपले पैशांच्या बाबतीतले हे अज्ञान दूर व्हायला फार जास्त वेळ लागतो आणि तोपर्यंत बहुतेकांनी स्वतःचे आणि पालकांचेही बरेच आर्थिक नुकसान वगैरे करून घेतलेले असते.

7. अविश्वास:

हे इतकं सहज कसं काय झालं? हा इतका चांगला का वागतोय? हि जास्त बोलत का नाही? हे असं कसं होऊ शकतं? "दाल में कुछ काला हैं." एकंदर अशाच विचार करण्याच्या पद्धतीवर बहुतेक पालकांचा विश्वास होता. त्यामुळे आपणही विश्वास ठेवण्यापेक्षा संशयच जास्त करायला शिकलो. कारणमीमांसा करणे आपल्याला कुणी शिकविलेच नाही.


आपल्या मुलांना एखादी गोष्ट जमणार नाही कारण त्यांना तिचा अनुभव नाही, ते चुकतील हा एकच विचार डोक्यात ठेऊन मुलांवर बऱ्याचदा अविश्वास दाखविला जातो. त्यामुळे मुलांच्या विविध अनुभवांतून शिकण्याच्या संधी पालक हिरावून घेत असतात. ह्याचा मुलांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होत असतो.


8. अपेक्षांचे ओझे:

पालक जे करू किंवा मिळवू शकले नाहीत त्यांची मुलांकडून पूर्तता व्हावी अशी त्यांची अपेक्षा असते. ह्यात तसे गैर काही नसले तरी जेव्हा ह्या अपेक्षांचे ओझे मुलांवर पडते तेव्हा मग आपण यशस्वी झालो असे तेव्हाच मानले जाते जेव्हा त्या अपेक्षा आपण पूर्ण करतो. अर्थातच बरेच जण ह्यात अपयशी ठरतात, म्हणजेच तसे ते अपयशी ठरवले जातात.


बरीच मुले पालकांनी ठरविल्याप्रमाणे डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ शकत नाहीत पण वेगळे काहीतरी करून दाखवतात किंवा त्यांच्या क्षमतेनुसार आपल्याला सिद्ध करून दाखवितात. त्यांच्या पालकांसाठी किंवा चार लोकांसाठी मात्र ते अपयशीच असतात.


9. लादली गेलेली नाती:

आपण जन्माला येताच आपण कुणाचे तरी भाचा-भाची, पुतण्या-पुतणी, नातू-नात इत्यादी होतो. जन्माने इतरांशी असलेली नाती जशीच्या तशी आपण जपावीत असा एक अलिखित नियम असतो. मग नात्यातील एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसली तरीही नात्याला सर्वोच्च स्थान देऊन कसा त्यांचा आदर करावा हेच आपल्याला सांगितले जाते. अशी नाती जपताना मुलांना जो त्रास होतो त्याचा कुणाला गंधही नसतो.10. मानसिक स्वास्थ्य वगैरे काही नसतं:

एक तर माणूस इतरांसारखाच नॉर्मल असतो किंवा मग वेडा असतो. त्याच्या अधेमधे काही नसतं. इतरांसारखाच दिसणारी, वागणारी, बोलणारी व्यक्तीही मानसिक आजाराने त्रस्त असू शकते किंवा तिला मानसिक आधाराची गरज असते असे त्यांना वाटतच नाही. मानसिक स्वास्थ्याचे गांभीर्य बऱ्याच पालकांनी अजून ओळखलेलेच नाही.


11. इमोशनल ब्लॅकमेलिंग:

"तुला वाटेल तसं कर, आमचा विचार नाही केलास तरी चालेल" ह्या वाक्याने भल्याभल्यांना बरेच काही करण्यापासून थांबविले आहे हे पालकांच्या लक्षात येत नाही.


इथे मांडलेली मते पालकविरोधी वगैरे वाटू शकतात. पण तसे काही नाही. आपल्या पालकांनी त्यांच्या काळात भरपूर कष्ट सोसली आहेत. तेव्हा जी परिस्थिती होती ती आपल्या मुलांवर ओढवू नये ह्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात.


त्यांचे आयुष्य, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती, त्यांना आलेले अनुभव आणि त्यानुसार त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या काळात कदाचित योग्य होते. त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्या गोष्टी हाताळण्याची पद्धतही वेगळी होती. त्यामुळे आपले पालनपोषण करताना आपल्यावरहि त्या पद्धती, दृष्टिकोन वगैरे बिंबविण्याचा ते प्रयत्न करतात, जे कि साहजिक आणि नैसर्गिक आहे. "हमारे जमाने में..." असं म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच गोष्टी एखाद्या विशिष्ट पद्धतीनेच करायला सांगितल्या जातात, कारण त्यांच्या दृष्टीने त्या पद्धतीच योग्य असतात.


पण आता काळ बदलला आहे, पद्धती बदलल्या आहेत. तेव्हाच्या पद्धती आताही तेवढ्याच परिणामकारक ठरतील असे नाही. तेव्हा त्यांनी घेतलेले निर्णय जसेच्या तसे आजच्या काळातही घेतले तर त्याचे तसेच परिणाम होतील असेही नाही. आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असे प्रत्येक पालकाला वाटणे साहजिक आहे. पण त्यांना ज्ञात असलेल्या पद्धतीनेच मुलांना यश मिळेल अन्यथा नाही असे त्यांना वाटणे नकळत त्यांच्या मुलांच्या प्रगतीस मारक ठरू शकते.


पालकांच्या प्रत्येक निर्णयाचा त्यांच्या मुलांच्या एकंदर आयुष्यावर किती मोठ्ठा परिणाम होत असतो. खरं तर पालकच समाज घडवीत असतात. तरीही पालकत्वाचे धडे घेताना फारसं कुणीच दिसत नाही ह्याचे मला खरंच आश्चर्य आणि चिंताही वाटते.


पालक आणि मुलांनीही ह्याचा विचार जरूर करावा कि पालक उतार वयात असताना आणि तुम्ही तुमच्या कर्त्या वयात असताना तुमच्यात खटके का उडतात. ह्याचे उत्तर कदाचित वर सांगितलेल्या मुद्द्यांमध्ये सापडेलच. हे टाळायचे असेल तर खालील दोन गोष्टी लक्षात घेणे मात्र अत्यंत महत्वाचे आहे.


1. एकीकडे मुलांनी हे समजून घ्यायला हवे कि पालक ज्या प्रकारे वागतात वा बोलतात त्यावर त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांचा आणि त्यांच्या एकंदर दृष्टिकोनाचा प्रभाव असतो. ते कदाचित मुद्दाम तुमचा विरोध करीत नसतात वा तुमच्याशी असहमती दर्शवित नसतात. त्यांच्याशी तुमच्या पद्धती आणि तुमचा दृष्टिकोन ह्याबद्दल चर्चा करा. केवळ काळ बदललाय आता तुम्हीही बदलायला पाहिजे असे म्हणून चालणार नाही. येथे तुम्हाला तरी कारणमीमांसा करता यायला हवी.


2. दुसरीकडे पालकांनी सुद्धा हे समजून घ्यावे कि एखादी गोष्ट साध्य करण्याचे वेगवेगळे मार्ग किंवा पद्धती असतात आणि मुलांना त्यांचा अवलंब करण्याची मुभा द्यावी. त्यांना चुका करण्याची आणि त्यापासून शिकण्याची संधी द्यावी. मार्गदर्शन जरूर करावे पण आपली मते मुलांवर लादू नयेत. उत्तम पालक कसे होता येईल हेही शिकता येते हे लक्षात घेऊन तसे प्रयत्नही करावेत.