तुमचं इंग्रजी बोलणं इतरांना खरंच कळतं का? (भाग - १)मराठी भाषिक नसलेले लोक जेव्हा मराठी बोलतात तेव्हा आपल्याला गम्मत वाटते, कारण त्यांना मराठी भाषेचा पुरेसा सराव नसल्याने ते कधीकधी चुकीचे शब्द वापरतात किंवा शब्दांचा उच्चार चुकीचा करतात. त्यामुळे कधीकधी अर्थाचा अनर्थही होतो.


आता जरा क्षणभर थांबून विचार करा कि तुम्ही जेव्हा इतर भाषा बोलता तेव्हा त्या मूळ भाषिक लोकांना पण तुमची गम्मत वाटत असेल. हो ना?

आपली मराठमोळी हिंदी भाषा तर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय, गुजराती, पंजाबी ई. लोकांचीही हिंदी बोलण्याची तऱ्हा वेगवेगळी असते. याचा अर्थ असा कि आपापल्या मूळ भाषेचा प्रभाव आपण जेव्हा इतर भाषा बोलतो तेव्हा जाणवतो. मग असाच आपल्या मराठी भाषेचा प्रभावही इंग्रजी बोलताना जाणवत असेलच, बरोबर ना?


ह्याला मदर टंग इन्फ्लूअन्स (MTI) किंवा फर्स्ट लँग्वेज इन्फ्लूअन्स (FLI) असे म्हणतात. आपल्या रोजच्या संभाषणात दिसून येणारी ह्याची काही गमतीशीर उदाहरणे बघूया.

शेवटी -cious असणाऱ्या शब्दांचा उच्चार: Spacious, Conscious इ. चा उच्चार बहुतेक मराठी भाषिक लोक स्पेशीअस, कॉन्शिअस असा करतात. परंतु, ह्यांचा खरा इंग्रजी उच्चार स्पे(इ)शस, कॉन्शस असा असतो.

शेवटी –cial असणाऱ्या शब्दांचा उच्चार: Commercial, Financial इ. चा उच्चार बहुतेक मराठी भाषिक लोक कमर्शिअल, फायनान्शिअल असा करतात. परंतु, ह्यांचा खरा इंग्रजी उच्चार कमर्शल, फायन्यानशल असा असतो.

त्याचप्रमाणे प, फ, व , र , ट, ड आणि इतरही अनेक उच्चार मराठी आणि इंग्रजीत वेगवेगळे आहेत बरं का!

MNC आणि ATM चा उच्चार बहुतेक मराठी भाषिक लोक एम एन सी कंपनी आणि ए टी एम मशीन असा करतात. परंतु, MNC म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनी मधला 'C' हा कंपनी साठी तर ATM म्हणजेच ऑटोमेटेड टेलर मशीन मधला 'M' हा मशीन साठीच असतो हे विसरतात.

आता हे वाचून गम्मत वाटत असेल तर मराठी आणि इंग्रजी भाषेमधले पुढील तीन फरक बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. खरं तर हे फरक जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण जसे दक्षिण भारतीय लोक मराठी किंवा इंग्रजी बोलतात तेव्हा तुम्हाला ते समजणे थोडे कठीण जाते; तसेच तुम्ही इंग्रजी ज्याप्रकारे बोलायला पाहिजे तशी बोलत नसाल तर ते समजणे मूळ इंग्रजी भाषिकांना कठीण जाते. ह्याचा परिणाम इंटरव्यू, प्रेझेंटेशन आणि मीटिंग मध्ये होत असतो. अशा वेळी अर्थाचा अनर्थ होण्याची वेळ न आलेलीच बरी.ज्यांना पुढे जाऊन मल्टिनॅशनल कंपन्या, हॉटेल इंडस्ट्री, रिअल इस्टेट, टूरिझम इंडस्ट्री, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग इ. क्षेत्रात नोकऱ्या मिळवून वरच्या पदावर जायचंय त्यांनी भाषेतील हे फरक जाणून घेतलेच पाहिजेत. तेव्हा लवकरात लवकर इंग्रजी भाषेचा हा वेगळेपणा आत्मसात करा आणि बघा लोक तुमच्या इंग्रजीवरील प्रभुत्वावर कसे इंप्रेस होतात.


1. शब्दांच्या प्रकारानुसार बदलणारा स्ट्रेस -

इंग्रजीत काही असे शब्द आहेत ज्यांचा वापर त्यांचे स्पेलिंग न बदलताही नाम आणि क्रियापद असा दोन्ही प्रकारे होतो. पण असे होताना त्यांचा उच्चार आणि अर्थही बदलतो. बऱ्याच लोकांना हा फरक माहीतच नसतो आणि नकळत ते चुका करत राहतात. खालील दोन्ही वाक्यांतील object ह्या शब्दाच्या बाबतीत हे कसे होते ते पहा.


I saw an object. (वस्तू)

ह्या वाक्यातील object हे एक सामान्य नाम आहे त्यामुळे त्याचा उच्चार करताना 'o' वर जोर किंवा स्ट्रेस द्यायचा असतो - object.


I object your honor! (आक्षेप / विरोध)

ह्या वाक्यातील object हे एक क्रियापद आहे त्यामुळे त्याचा उच्चार करताना 'je' वर जोर किंवा स्ट्रेस द्यायचा असतो - object.


ह्याला इंग्रजीत Word Stress असे म्हणतात. आणखीहि असे बरेच शब्द इंग्रजीत आहेत जसे कि: Record, Engineer, Content etc. या संबंधीचे काही सोपे नियम तुम्ही शिकलात कि सगळं तुमच्या सहज लक्षात येईल.


(ह्यासंबंधीचा व्हिडीओ बघण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा - https://youtu.be/jRJP-QWTsXc )

 

2. वाक्यातील विशिष्ट शब्दांवरच दिला जाणारा स्ट्रेस -

इंग्रजीत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे वाक्यातील विशिष्ट शब्दांवरच दिला जाणारा स्ट्रेस. खालील वाक्यांतील बोल्ड केलेल्या शब्दांवरच स्ट्रेस द्यायचा आहे. याला इंग्रजीत Sentence Stress असे म्हणतात. तुम्ही मूळ इंग्रजी भाषिकांना बोलतांना काळजीपूर्वक ऐकले तर तुमच्या लक्षात येईल कि ते मोजक्याच शब्दांवर स्ट्रेस देतात आणि बाकी शब्द पटकन बोलून जातात किंवा त्यांवर स्ट्रेस देत नाहीत. ह्याचेही काही अगदी सोपे नियम आहेत.


उदा. The blue shirt on the left is my favorite.

His father has gifted him a sports bike.


आपण इंग्रजी शिकताना एकेक शब्द उच्चारायला शिकलो. महत्वाचे म्हणजे हे शब्द जेव्हा वाक्यात वापरले जातात तेव्हा त्यांचा उच्चार किंचित बदलतो किंवा वाक्यातील काही विशिष्ट शब्दांवरच स्ट्रेस द्यायचा आणि काही शब्द पटकन बोलायचे हे आपण शिकलोच नाही. त्यामुळे आपण वाक्यातील प्रत्येक शब्दावर एकसारखा स्ट्रेस देऊन बोलतो. आता स्वतःला एखाद्या मूळ इंग्रजी भाषिकाशी बोलताना इमॅजिन करा. त्याला नक्कीच तुमची गम्मत वाटत असेल. हो कि नाही?

 

3. बोलताना शब्द एकमेकांना जोडणे -

वर उल्लेख केल्याप्रमाणे वाक्यातील काही शब्दांवर स्ट्रेस द्यायचा नसतो. ते पटकन बोलायचे असतात. आता हे पटकन बोलणे म्हणजे तुमच्या बोलण्याचा वेग वाढविणे नव्हे. इंग्रजीत बोलताना काही शब्द एकमेकांना जोडले जातात तर काही शब्द छोटेही केले जातात. हे कसे केले जाते ते बघूया.


‘Switch it off’ हे तीन शब्द कसे जोडले जातात ते पहा:

1. Swi tchi toff (शब्द जोडले)

2. Switchitoff (तीन शब्दांचा एक शब्द केला)


‘My name is Rachel’ हे चार शब्द कसे जोडले जातात ते पहा:

1. Mynamiz Rachel (शब्द जोडले)

2. Mynamiz Rachel (चार शब्दांचे दोन शब्द केले)


‘Parallel lines’ हे दोन शब्द कसे जोडले जातात ते पहा:

1. Parallelines (शब्द जोडले)

2. Parallelines (दोन शब्दांचा एक शब्द केला)


येथे बोल्ड केलेल्या अक्षरांवारच स्ट्रेस द्यायचा असतो. ह्याला Linking किंवा Assimilation म्हणतात. याचेही काही सोपे नियम तुम्ही शिकलात कि तुम्हाला खरंच अस्खलित इंग्रजी बोलल्यासारखे वाटेल.


ह्याव्यतिरिक्तही मराठी आणि इंग्रजी मधले आणखी दोन अत्यंत महत्वाचे फरक आहेत ज्याबद्दल पुढच्या लेखात चर्चा केली आहे. पुढचा लेख वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.


53 views0 comments